रंगाचे राजकारण बंद करा : खासदार जलील !

Foto

औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मला विकासासाठी मत दिले आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे ओझे माझ्यावर आहे. त्यामुळे मी हिंदू-मुस्लीम वादात पडू इच्छित नाही. खासदार म्हणून मला कोणतीही जात धर्म नाही, रंगाचे राजकारण बंद करा, असे प्रतिपादन नवनियुक्त खासदार इम्तियाज जलील यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

 मी निवडून आल्यानंतर आता काय होणार, असे वातावरण निर्माण केले जात आहे. हिंदू समाज धोक्यात असल्याचा प्रचारही शिवसेनेकडून केला जातोय. हिंदूंची सुरक्षा आम्हीच करू असाही दावा सेनेचे नेते करत आहेत. मात्र सेनेला हे करण्याची मुळीच गरज नाही, त्यासाठी कायदे आहेत, प्रशासन आहे.  शहर आणि जिल्हामध्ये भयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सोशल मीडियावर समाजस्वास्थ्य बिघडवणारे मेसेज फिरत आहेत ते कुणाचीही असो पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे जलील म्हणाले. औरंगाबाद शहराला विमानसेवा, रेल्वे सेवा आणि रस्त्यांचे जाळे चांगले करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. समांतर योजना शहरासाठी चांगली नाही आता या योजनेवर विचार करण्याची वेळ आली आहे. शहराच्या विकासासाठी शांतता गरजेची आहे. त्यामुळेच मोठे उद्योग शहरात येतील अशावेळी प्रत्येकाने कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. दुर्दैवाने मला मुस्लिम खासदार म्हणून संबोधित केल्या जात आहे. खासदाराला कोणतीही जात नसते त्यामुळे एका समाजाचे लेबल लावणे दुर्दैवी आहे. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणार असल्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.